Congress | (File Image)

मरगळ झटकून महाराष्ट्र काँग्रेस ( Maharashtra Congress) काहीशी कार्यरत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामळे काँग्रेस (Congress) नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या असून, त्याचा परिणामही पाहायला मिळत आहे. एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले विद्यमान शिवसेना (Shiv Sena) नेते रणजितसिंह देशमुख (Ranjitsinha Deshmukh) हे पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत ते काँग्रेस प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. मुंबई येथील गांधी भवन या काँग्रेस कार्यालयात देशमुख यांचा पक्ष प्रवेश पार पडेल. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि इतरही काँग्रेस नेत्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

रणजितसिंह देशमुख हे युवा नेते आहेत. सध्या ते शिवसेना पक्षात असले तरी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेस पक्षातूनच झाली. ते सातारा जिल्हा काँग्रेसचे युवक अध्यक्षही राहिले आहेत. माण- खटाव या दुष्काळी तालुक्यात सहकारी कृषी उद्योग उभारणीत त्यांचा मोला वाटा आहे. याशिवाय 2007 मध्ये ते जिल्हा परिषदेवरही निवडूण आले होते. या काळात त्यांनी काँग्रेस तळागाळा पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 2003 मध्ये पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सातारा दौऱ्यावर आल्या होत्या. या वेळी या दौऱ्याचे यशस्वी नियोजन ही देशमुख यांनी केले होते. या नियोजनाचे काँग्रेसध्ये तेव्हा चांगले कौतुक झाले होते. (हेही वाचा, Chandrakant Pati: पत्रकारांनी आक्षेप घेताच चंद्रकांत पाटील यांची सारवासारव म्हणाले ' गैरसमज नसावा')

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांच्या दोन्ही गटांमध्ये नुकतेच मनोमिलन झाले. त्यानंतर पहिलाच राजकीय परिणाम पाहायला मिळत आहे. रणजितसिंह देशमुख काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे माण- खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.