Ram Shinde, Milk Agitation (PC - Facebook, ANI)

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत. त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे, अशी खोचक टिका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी केली. राज्यात आज पहाटेपासून दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आज राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

यावेळी राम शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आज केलेलं आंदोलन हे महाराष्ट्रातील तिगडी सरकारविरोधातील आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून दुध दरवाढीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या कोरोना संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकारला जाग यावी यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. (हेही वाचा - गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलिस दलातील 232 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर एक जणांचा मृत्यू)

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. या घरातील कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे आणि प्रजा मोठ्या संकटात सापडली आहे. भाजप सरकार सत्तेत असताना आम्ही शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान देण्याचे ठरवले होतं. परंतु, या सरकारने शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान दिले नाही, असंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज राज्यभरात दूध उत्पादक संघर्ष समिती आणि विरोधीपक्षांच्यावतीने दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी शेतकरी आपली दुभती जनावरं गावातील चावडीवर बांधत सरकारचा प्रतिकात्मक निषेध व्यक्त करत आहेत. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. सरकारने तात्काळ दुध दरवाढीसंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यकर्त्यांच्या दारात आंदोलन करू, असा इशारा अजित नवले यांनी दिला आहे.