दूध आंंदोलन । Photo Credits: Twitter/ Sadabhau Khot

महाराष्ट्र राज्यात आज (1 ऑगस्ट) पुन्हा दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. दूध उत्पादक संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने आज राज्यात सकाळापासूनच आंदोलनं सुरू करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जनावरांना चावडी वर बांधून तर काही ठिकाणी देवाला दूधाचा अभिषेक करत सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

कोरोना संकटाचा फटका समाजाच्या सार्‍याच घटकांना बसला आहे. अशामध्ये आजही लॉकडाऊन सुरू असल्याने दूधाचे दर कोसळले आहेत. परिणामी शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. या कठीण काळात दूध उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने आता अनेक शेतकरी संघटनांनी दूधाचे दर वाढवण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीदेखील मंत्रालयामध्ये याबाबत बैठक झाली. मात्र कोणताच तोडगा निघत नसल्याने आज पुन्हा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात आले आहे.

सदाभाऊ खोत यांचं ट्वीट 

 

सध्या शेतकर्‍यांच्या प्रति लिटर दुधाला 10 रुपये अनुदान मिळावं, 30 रुपये दुधाला हमी भाव मिळावा आणि आयात होणारी दुध पावडर बंद करा अशा शेतकर्‍यांच्या सध्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी पुण्यात भाजप देखील आक्रमक झाली आहे. आज चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली नायगाव येथील शासकीय दूध संकलन केंद्राबाहेर आंदोलन करण्यात आले. त्याप्रमाणेच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात पंढरपूर मध्ये चंद्रभागा नदीच्यापात्रात विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्यात आले तर रयतक्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नामदेव पायरीजवळ विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे.