गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलिस दलातील 232 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर एक जणांचा मृत्यू
Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

राज्यात कोरोना संकट अधिक गडद होत चाललं आहे. कोरोना लढाईत योद्धा म्हणून काम करणाऱ्या अनेकांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत हजारो कोरोना योद्ध्यांना या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलिस दलातील (Maharashtra Police) 232 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी (Corona Test) पॉझिटिव्ह आली असून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 9 हजार 449 पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच 103 कर्मचाऱ्यांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशी ठरली आहे. तसेच 7 हजार 414 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. (हेही वाचा - गणेशोत्‍सवासाठी रायगड जिल्‍ह्यातील येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस होम क्‍वारंटाइन रहावे लागणार; जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केल्या मार्गदर्शक सूचना)

सध्या 1 हजार 932 पोलिस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र पोलिस विभागाने माहिती दिली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी 10 हजार 320 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, 265 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण  कोरोनाग्रस्तांची संख्या 4 लाख 22 हजार 118 इतकी झाली आहे.