गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) रायगड जिल्ह्यातील (Raigad District) येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन (Home Quarantine) रहावे लागणार आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गणेशोत्वासाठी मुंबई-पुणे तसेच जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना 7 ऑगस्टपूर्वी जिल्ह्यात दाखल व्हावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी निधी चौधरी यांनी राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून रायगड जिल्हयासाठी परीपत्रक जारी केले. या परिपत्रकात होम क्वारंटाइनबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकानुसार, गावात होम क्वारंटाईन आदेशच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोरोना प्रतिबंधक समिती आणि संरपंच यांच्यावर असणार आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलनं सुरू; पुणे, पंढरपूर मध्ये निदर्शनं)
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या जिल्ह्यात 15 हजार पेक्षा जास्त जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता निधी चौधरी यांनी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.
येत्या २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. कोरोना संकटामुळे राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. घरांमध्ये गणपती मूर्ती दोन फुटांची असावी तसेच घरातील गणेशमूर्ती शक्यतो धातू अथवा संगमरवरी असावी. त्याचप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत, अशा सूचनादेखील सरकारने केल्या आहेत.