Raju Shetty And Raj Thakre (Photo Credits: PTI)

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आज पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) यांची भेट घेतली. या भेटीत या दोघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. पुढे येणा-या विधानसभा निवडणुकांसंदर्भात रणनीती आखणी संदर्भात ही चर्चा होती अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

राजू शेट्टी यांना या भेटीबद्दल विचारले असता, आपण राज ठाकरें सोबत ब-याच मुद्द्यांवर चर्चा केली असून महाआघाडीत मनसेला घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले. राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात ब-याच चर्चा रंगू लागल्या आहेत.

यापूर्वी राजू शेट्टींनी राज ठाकरे यांची 28 मे रोजी भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुढील रणनीती आखण्यासाठी महत्त्वाच्या भेटीगाठी सुरु केल्या . 28 मे रोजी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे आणि राजू शेट्टी आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याबद्दल चर्चेला उधाण आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांनी या भेटीत नेमकी काय रणनीती आखली आहे हे येत्या काही दिवसांत कळेलच.