Raj Thackeray | Twitter

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाकडून आज मुंबई शहरात पाचही टोल नाक्यांवर संपूर्ण टोलमाफीचा निर्णय (Toll Free Mumbai)  झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. या मोठ्या घोषणेनुसार आता आज रात्री 12 वाजल्यापासून मुंबईत ऐरोली, वाशी, मुलुंड, दहिसर, आनंदनगर या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल द्यावा लागणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेने (MNS) कडून मागील 12 वर्ष त्यासाठी आंदोलनं केली जात होती. आजच्या राज्य सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर मनसे कडून सराकारच्या या निर्णयाचं स्वागत करून आनंद व्यक्त केला जात आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी X वर पोस्ट शेअर करत राज्य सरकार आणि मनसे कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

राज ठाकरे यांची टोल फ़्री वर प्रतिक्रिया

 

जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत ही राज ठाकरेंची मागणी होती. 'किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. ' असे राज ठाकरे म्हणाले आहेत. 'महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे 'टोलच्या आंदोलनाचं काय झालं?' असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. ' असेही नमूद केले आहे.

दरम्यान मनसे कडून टोलनाक्यांवर मिठाई वाटप सुरू झाले आहे. मुंबई सह राज्यभर मनसेने टोल विरोधी खळ्ळ खट्याक आंदोलन केले होते.  यासाठी राज ठाकरेंसह अनेक मनसे कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे दाखल आहेत. राज्य सरकारच्या टोल माफीच्या निर्णयामुळे मात्र आता सरकारच्या तिजोरीवर भार येणार आहे. 2026 पर्यंत हे टोलनाके सुरू राहणार होते पण आता टोलमाफीचा निर्णय झाल्याने 5000 कोटींचा भार येणार आहे.