Mumbai Local: सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज; मात्र, राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा - मध्य रेल्वे
Mumbai Local (Photo Credit - PTI)

Mumbai Local: कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मुंबईतील लोकल (Mumbai Local) सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलचा दरवाजा कधी उघडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर आता मध्य रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. परंतु, यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे राज्य सरकार सर्वसामान्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात विचार करत आहे, असं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितलं आहे. (वाचा - Mumbai Local For General Public: मुंबई लोकल सेवा सर्व मुंबईकरांसाठी सुरु होण्याची शक्यता, लवकरच होणार निर्णय)

मित्तल यांनी पुढे सांगितले की, मध्य रेल्वेने इतर पर्यायांनी गाड्या सुरू केल्या आहेत. राज्य सरकारने सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी दिल्यानंतर लवकरचं पूर्ण क्षमतेने लोकल सुरू होतील. राज्य सरकारबरोबर रेल्वेचा चांगला समन्वय आहे. सरकारने आतापर्यंत 20 श्रेणीतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान, लॉकडाऊनपूर्वी मध्य रेल्वेकडून 1774 लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. परंतु, त्यानंतर कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून 1580 रेल्वे गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास रेल्वे प्रशासन सज्ज आहे. राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर लवकरचं सर्वसामान्यासाठी रेल्वीचे दरवाजे उघडण्यात येतील, असं मित्तल यांनी सांगितलं आहे.