Cyclone | Image Used For Representational Purpose| Photo Credits: Wiki Commons.com

महाराष्ट्राच्या उत्तर भागात 3 जून दिवशी निसर्ग चक्रीवादळ (Nisarga Cyclone )धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान रायगडमधील हरिहरेश्वर जवळून हे चक्रीवादळ जाणार असल्याने येथील नागरिकांना, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने 3 जूनच्या पहाटे 2 वाजल्यापासून पुढील 48 तास कलम 144 अंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये संचारबंदी (Curfew) असेल त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित रहावे, समुद्र किनार्‍यापासून दूर रहावे असे आदेश दिले आहेत. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफचे (NDRF) पथक तैनात करण्यात आले आहे. समुद्रात गेलेल्या बोटींना माघारी किनार्‍यावर आणण्याचं काम सध्या सुरू आहे. Nisarga Cyclone Tracker: अरबी समुद्रात 3 जून पर्यंत तीव्र होणार चक्रीवादळ; पहा 'निसर्ग' चक्रीवादळाच्या प्रवासाच्या प्रत्येक दिवसाचे अंदाज.  

दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात या भागात निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. Nisarga Cyclone च्या संभाव्य धोक्यामुळे पालघर मध्ये 3 जूनला सर्व दुकाने व व्यापारी आस्थापने बंद ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश.

रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग आणि श्रीवर्धन येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात आहेत. तर मुरुड मध्ये तटरक्षक दलाची तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. उरण येथेदेखील सागर सुरक्षा बलाचे जवान नागरिकांच्या सुरक्षेसाठी असतील. कोलाडमध्ये रिव्हर राफ्टिंग पथकांना मदतीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किनारपट्टीवर कच्च्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात प्रशासनाने दिल्या आहेत. गावागावात उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्ष, समाजमंदीर आणि ग्रांमपचायत इमारतींचा वापर करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत.

रायगड पोलिसांचे आवाहन 

दरम्यान रायगडमध्ये चक्रीवादळाच्या संकटामध्ये नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी कोस्ट गार्डकडून मदत हवी असल्यास 1093 या क्रमांकावर मदत मिळणार आहे तर ०२१४१-२२२११८ या पोलिस यंत्रणेच्या व्यवस्थेसोबत संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.