‘राजयोग’ नसल्यानेच राहुल गांधी यांना ‘द्राविडी प्राणायाम’ करावे लागत आहे: शिवसेना
Rahul Gandhi and Uddhav Thackeray | | (Photo credit: archived, edited, Representative images)

योग दिनाचे (International Yoga Day) औचित्य साधात शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टिकेचे वाग्बाण सोडले आहेत. राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरु असताना राहुल गांधी यांचे मोबाईल पाहणे. तसेच, रामदेव बाबा यांनी काँग्रेसला योगा करण्याचा दिलेला सल्ला यावरुन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. हा निशाणा साधताना '‘राजयोग’ नसल्यानेच राहुल गांधी यांना ‘द्राविडी प्राणायाम’ करावे लागत आहे', असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

काँग्रेससारख्या पक्षांना सध्या शवासनाची गरज

शिवसेनेचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामनामध्ये 'राज'योग' खरा!' या मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘योग’ अनेक आहेत, पण ‘राजयोग’ सगळय़ात महत्त्वाचा आणि खरा! हा राजयोग मोदींना मिळाला. त्यामुळे ‘योग’ व ‘सत्ता’ याचा संबंध आहे हे मान्य करावे लागेल. ‘राजयोग’ नसेल तर मैदानात, बगिच्यात फक्त चटया अंथरून श्वास आत-बाहेर सोडण्यात काय हशील? त्यामुळेच संसदेच्या सभागृहातही अनेकदा विरोधी बाकांवरील सदस्य ‘डुलकी योग’ किंवा ‘आरामासन’ करताना दिसत असावेत, असे उद्धव ठाकरे म्हणतात.

 ‘राजयोग’ नसल्यानेच राहुल यांचे ‘द्राविडी प्राणायाम’

उद्धव ठाकरे पुढे म्हणतात की,  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सभागृहात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण सुरू असताना बराच वेळ ‘मोबाईल योग’ करताना दिसले. तोदेखील बहुधा राजयोग नसण्याचाच परिणाम असावा. काँग्रेस पक्षाने त्यावर असा खुलासा केला आहे की, राष्ट्रपतींच्या भाषणातील काही हिंदी शब्दांचा अर्थ राहुल यांना समजला नाही. त्यामुळे ते मोबाईलमध्ये त्या शब्दांचा अर्थ शोधत होते. आता खरे काय हे राहुल आणि त्यांच्या पक्षालाच माहीत; पण ‘राजयोग’ नसल्यानेच राहुल यांना हे असे ‘द्राविडी प्राणायाम’ करावे लागत आहेत हे मात्र खरे. मुळात काँग्रेससारख्या पक्षांना सध्या शवासनाची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, International Yoga Day 2019: अमित शाह परत फिरताच नागरिकांचा चटईवर डल्ला; योग दिन कार्यक्रमातील घटना)

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. लोकसभेत राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरु असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मोबाईल पाहण्यात व्यग्र होते. राहुल गांधी यांच्या या वर्तनावर प्रचंड टीका होत आहे. या टीकेनंतर काँग्रेसने त्याला उत्तर देण्याच प्रयत्न केला आहे. दरम्यान, योग दिनानिमित्त बोलताना बाबा रामदेव यांनी विरोधकांकेड पाच वर्षे बराच वेळ आहे. त्यामुळे विरोधकांनी कपालभारती योगा करावा, असे म्हटले होते. तसेच, काँग्रेस योगा करत नसल्यामुळेच ते सत्तेतून बाहेर असल्याची कोपरखळीही बाबा रामदेव यांनी मारली होती. हाच धागा पकडत शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.