Pune: वाकड पोलिसांच्या कारवाईची सर्वत्र चर्चा, वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात काढली धिंड
Maharashtra Police | (File Photo)

पुण्यात (Pune) गेल्या काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यातच वाकड (Wakad) परिसरात दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हतोबा नगर झोपडपट्टीसमोर जवळपास 15 मालवाहक ऑटो रिक्षांची तोडफोड (Vehicle Vandalism) केल्याची माहिती समोर आली होती. या संतापजनक प्रकारानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक (Accused arrest) केली आहे. तसेच या गुंडाच्या टोळक्याची परिसरातील दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. आरोपींना अटक केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त करत सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगे, सागर घाडगे, चंद्रकांत गायकवाड, मयूर अडागळे, अविनाश नलावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. म्हतोबा नगरमधील नवीन उभारण्यात आलेल्या कॉम्प्लेक्स समोर अनेक रिक्षाचालक रिक्षा उभी करून तिथे लघुशंका करायचे. रिक्षाचालकांना अनेकदा सांगूनही त्यांचे असे कृत्य सुरूच होते. याचाच राग मनात धरून आरोपीने मित्राच्या मदतीने रिक्षांची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परंतु, वाकड पोलिसांनी संबंधित आरोपींना धडा शिकवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी धिंड काढल्याची माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा-Uttar Pradesh: बलात्कारास विरोध, प्रियकराकडून प्रेयसीची हत्या; उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील घटना

पिंपरी चिंचवड परिसरात यापूर्वीही अनेकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. एखाद्या परिसरात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काही भरकटलेले तरुण अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. परंतु, अशा आरोपींना चाप बसवण्यासाठी वेळोवेळी पोलीस कारवाई करत आहेत. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अशाप्रकराची धिंड काढून त्यांची दहशत संपवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. वाकड पोलिसांच्या कारवाईची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.