महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात एका 46 वर्षीय शिक्षकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात येणे बंद केल्याने हे शिक्षक त्रस्त होते व याच करणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची नुकतीच पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद ज्ञानेश्वर देवकर असे या शिक्षकाचे नाव आहे.
माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांनी शाळेत स्वच्छता मोहीम सुरू केली होती. मात्र शाळेत पुरेसे सफाई कर्मचारी नसल्याने त्यांनी शाळेची स्वच्छता करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेतली. ही बाब समजताच संतप्त पालकांनी आपल्या मुलांना इतर शाळांमध्ये दाखल करायला सुरवात केली. यामुळेच शिक्षकाला नैराश्य आले. मुलांनी शाळेत येणे बंद करणे हे आपले व्यावसायिक अपयश मानून शिक्षकाने स्वतःचा जीव घेतला.
3 ऑगस्ट रोजी दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडीजवळील होले वस्ती येथील शाळेत कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. कॉन्स्टेबल रमेश गायकवाड यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, त्यांनी मागे एक चिठ्ठी सोडली आहे व त्यात आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. स्वच्छता मोहिमेनंतर पुढील काही दिवसांत 10 पैकी नऊ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला होता.
देवकर यांनी मुलांच्या पालकांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना यश आले नाही. कीटकनाशक प्यायल्यानंतर देवकर यांना 3 ऑगस्ट रोजी ग्रामीण उरुळी कांचन येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथे 8 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Pune Shocker: पत्नीला नग्न अवस्थेमध्ये नाचायला भाग पाडून व्हिडिओ शूट केला; गुन्हा दाखल, तपास सुरु)
देवकर हे पुरंदर तालुक्यातील मावडी पिंपरी गावचे रहिवासी असून पुण्यातील उरुळी कांचन येथे पत्नी व दोन मुलांसह राहत होते. शाळेतील कोणीही आपली मदत केली नसल्यानेच शाळेच्या साफसफाईसह इतर सर्व कामे त्यांनी स्वत:कडे घेतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना शाळेत पाठवण्यास पालकांचे मन वळवण्यात अपयश आल्याने त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.