
गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान (Heavy Rains) घातले आहे. मुंबई, पुणे, कोकण, मारावढा, विदर्भ अशा सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पार्श्वभुमीवर पुणे (Pune) जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये 16 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. आता पुणे महापालिकेने खासगी कंपन्यांनादेखील पुढील दोन दिवस कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आहे.
आयएमडीने आठवड्याच्या शेवटपर्यंत राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर येथे रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी धोका टळला नाही. अशा परिस्थितीत नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये किमान 8 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी बुधवारी येथे दिली. मंगळवारी रात्री उशिरा नागपुरात केळवदजवळील भरून वाहणाऱ्या ब्रह्मणमरी नाल्यावरील छोटा पूल ओलांडताना एसयूव्हीमधून प्रवास करणारे सहा जण वाहून गेले. 3 मृतदेह पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत, तर इतर बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे. (हेही वाचा: पुण्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश; घ्या जाणून कोणत्या ठिकाणी कलम 144 लागू?)
आज सकाळी, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या, यामुळे अनेक तास वाहतूक खोळंबली होती. कल्याण-मुरबाड मार्गावरील मोरोशी येथेही दरड कोसळल्याने काही तास वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईत अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, घाटकोपर, दादर अशा अनेक भागांत पाणी साचले होते. पालघरमध्येही मुसळधार पावसाने थैमान घातले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बुधवार-गुरुवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.