Pune-Mumbai Missing Link Project

पुणे-मुंबई मिसिंग लिंक प्रकल्पाचे (Pune-Mumbai Missing Link Project) उद्घाटन या वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर, त्याचा मुंबई व पुणे अशा दोन्ही शहरातील लोकांना मोठा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कामगिरी अहवालाचे प्रकाशन करण्यासाठी फडणवीस पुण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी नवी मुंबई विमानतळाच्या चालू बांधकाम स्थळांना आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक स्ट्रेचला भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होईल. महामार्गावरील घाटाचा भाग यामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा 9 किलोमीटर लांब व 23 मीटर रुंदचा असून देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची 185 मीटर आहे. देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याही ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा: Mumbai Metro Line 11: वडाळा ते सीएसएमटी मेट्रोसाठी MMRCL कडून प्रस्ताव; भेंडीबाजार व नागपाडा स्थानकांनीही जोडली जाणार)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्यावतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण 94 टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले. महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच इंधनाचीही बचत होईल, प्रदूषणही कमी होईल. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना व राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.