
Wadala to CSMT : मुंबई मेट्रोची अॅक्वा लाईन 3 ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार असताना, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने आणखी एका नवीन भुयारी मेट्रो मार्गासाठी तयारी सुरू केली आहे. MMRCL ने मेट्रो लाईन 11 (Mumbai Metro Line 11) साठीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठवला आहे. ही लाईन वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान प्रस्तावित आहे.
नवीन मेट्रो मार्ग नागपाडा आणि भेंडीबाजार मार्गे
हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, MMRCL ने सादर केलेल्या डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) मध्ये मेट्रो लाईन 11 ची एकूण लांबी 17.5 किमी असणार आहे. ही लाईन पूर्व मुंबईतील अनिक डेपो पासून सुरु होऊन दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाईल. या मार्गात नागपाडा आणि भेंडीबाजार यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश आहे. अनिक डेपो वगळता हा संपूर्ण मार्ग भुयारी असेल.
MMRCL च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सदर प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाच्या (UDD) विचाराधीन आहे. त्यानंतर तो केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. यासाठीची व्यवहार्यता चाचणी व DPR हा मंजुरीसाठी महत्त्वाचा भाग आहे.
नवीन डेपो आणि इंटरमोडल एकत्रिकरण
या योजनेअंतर्गत BEST च्या अनिक-प्रतिक्षा नगर डेपोजवळील 16 हेक्टर जागेत नवीन सहा डब्यांच्या मेट्रोसाठी डेपो उभारण्यात येणार आहे. यामुळे मेट्रो आणि बस यामध्ये समन्वय साधता येईल.
लाईन 11 हा मार्ग अनेक महत्वाच्या ट्रान्सपोर्ट नेटवर्कशी जोडला जाईल, उदा.:
- मेट्रो लाईन 4 (वडाळा–ठाणे–कासारवडवली),
- अॅक्वा लाईन 3,
- मोनोरेल,
तसेच बायकुला आणि सीएसएमटीसारख्या उपनगरी रेल्वे स्थानकांशीही हा मार्ग जोडला जाईल.
स्थानक बांधकामाचे तपशील
या लाईनवर एकूण 13 स्थानके असतील. यातील 8 स्थानकांचे बांधकाम कट-ऍण्ड-कव्हर पद्धतीने केले जाईल, तर उर्वरित 5 स्थानकांसाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (NATM) वापरली जाईल. ही पद्धत शहरातील दाट भागांमध्ये सुरंग बांधणीसाठी उपयुक्त आहे.
दररोजची प्रवासी संख्या आणि अंदाजित वेळापत्रक
MMRCL च्या अंदाजानुसार, 2031 पर्यंत दररोज सुमारे 5.8 लाख प्रवासी या लाईनचा वापर करतील, तर 2041 पर्यंत ही संख्या 8.69 लाखांपर्यंत पोहोचेल. प्रकल्पासाठी निविदा, अंमलबजावणी आणि काम पूर्ण होण्यासाठीची कालमर्यादा राज्य व केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर ठरवली जाईल. लाईन 11 मंजूर झाल्यास ती मुंबईतील ऐतिहासिक आणि गर्दीच्या परिसरांना अधिक सुलभ आणि वेगवान कनेक्टिव्हिटी देईल.