Dead-pixabay

पुण्यामध्ये MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवत राज्यात तिसरी येण्याचा मान पटकवलेल्या तरूणीचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह आढळला आहे. मृत मुलगी 26 वर्षीय दर्शना पवार आहे. पुण्यात सत्कार स्वीकारायला गेलेल्या दर्शनाचा पत्ता लागत नव्हता त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसांत जबाब नोंदवला. दर्शना आपल्या मित्रांसोबत फिरायला गेली होती. पुण्यात सत्कार स्विकारायला गेल्यानंतर तिच्यासोबत नेमकं काय झालं? याचं गूढ अद्यापही कायम आहे.

वेल्हे पोलिस स्टेशनमध्ये दर्शनाच्या मृत्यूची नोंद अकस्मात निधन अशी करण्यात आली आहे. दर्शना मूळची अहमदनगरच्या कोपरगावची आहे. मागील काही वर्ष ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यात ती तिसरी आली होती. या तिच्या यशानंतर कौतुकाची थाप देण्यासाठी पुण्याच्या अकॅडमीने सत्कार सोहळा आयोजित केला होता.

सत्कार स्वीकारण्यासाठी दर्शना 9 जूनला पुण्यात आली. नर्हे मध्ये ती मैत्रिणीकडे राहत होती. 12 जूनला ती मैत्रिणीला सांगून सिंहगड किल्ल्याला ट्रेकिंगला गेली. तसं तिने कुटुंबालाही कळवलं होतं. 12 तारखेपासून तिचा फोन बंद होता. दर्शनाचा फोन लागत नसल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. दर्शना आणि तिचा मित्र देखील बेपत्ता असल्याचं समजलं. पोलिसांनी केलेल्या ट्रॅकिंगनुसार त्यांचे शेवटचे लोकेशन वेल्हा दाखवण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. Hyderabad Woman Killed In London: हैदराबादच्या तरुणीची ब्राझीलच्या फ्लॅटमेटकडून लंडनमध्ये हत्या, यंदाच करणार होती विवाह .

राजगडाच्या पायथ्याशी तरूणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला. तिच्यासोबत काही वस्तू, मोबाईल देखील आढळला. दरम्यान दर्शनासोबत गेलेल्या तिच्या मित्राचा अजूनही शोध लागलेला नाही. नेमक घडले काय, याचा पोलीस तपास सुरू आहे. सिंहगड रोड, वारजे आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा एकत्रित तपास केला जात आहे.