प्रतिकात्मक फोटो (File Photo)

पुण्यातील (Pune) दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग (Sexual Harassment) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कन्नड (Kannada) तालुक्यातील आंबा तांडा येथील उच्च विद्यालयात घडली आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवत याप्रकरणातील दोन्ही शिक्षकांनी विनयभंग केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. सध्या याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप शिखरे आणि अनुप राठोड असे आरोपींचे नाव आहेत. हे दोघेही उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान शुक्रवारी आरोपींनी पीडितासह 3 मुलींना प्रयोगशाळा रुम साफसफाई करण्यास सांगितले होते. मात्र, तिच्यासोबत असणाऱ्या दोन मुली झाडू आणण्यासाठी गेल्या असताना आरोपींनी लग्नाचे आमिष दाखवत तिचा विनयभंग केला. त्यानंतर घडलेला हा सर्वप्रकार पीडिताने आपल्या वर्गशिक्षकांना सांगितला. तसेच आपल्या वडिलांनाही फोनद्वारे याबाबत माहिती दिली. शुक्रवारी सायंकाळी पिडीता व आईवडील यांनी कन्नड पोलिस ठाण्या जाऊन दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही : नीलम गोऱ्हे

देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली असतानाच वरील घटनेने यात आणखी भर घातली आहे. आई-वडिलांनंतर शिक्षकांना मोठा दर्जा दिला जातो. मात्र, दिवसेंदिवस घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना समाजातील लोकांचा दृष्टीकोन बदलण्यास भाग पाडत आहेत.