Gun Shot | Photo Credit - Pixabay

पुणे शहरातील (Pune City) वाढती गुन्हेगारी (Crime) सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. गुन्हेगाऱ्यांवर पोलिसांचा देखील कोणताच वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. कधी कोयता गँगचा धुमाकूळ तर कधी कोयत्याने मारामाऱ्या झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आज पुण्यात अशीच एक धक्कादायक प्रकार आला आहे. पुण्यात भरदिवसा तिघांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.  (हेही वाचा - Mumbai Crime: मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; 560 किलो सीबीएसचीचा साठा जप्त, दोघांना अटक)

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी 3 राऊंड फायर केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारात सुरज तात्याबा लंगार हा 21 वर्षीय तरूण जखमी झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

वारजे माळवाडी परिसरातील जय भवानी चौक पाण्याच्या टाकीजवळुन सुरज जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी गोळीबार सुरू केला. ही गोळी जखमी तरुणाच्या डाव्या बाजूला चाटून गेली असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे.