पुण्यातील कल्याणीनगर रविवारी पहाटे अलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची (Pune Accident) घटना घडली होती. ही पोर्शे गाडी एक अल्पवयीन बिल्डरचा मुलगा चालवत होता. हा धनिकपुत्र पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. त्याने बाईकवरुन जात असलेल्या अनिश अवधिया (Anish Awadhiya) आणि अश्विनी कोस्टा (ashwini kosta) यांना चिरडले होते. समोरुन येणाऱ्या मोठ्या मोठ्या वाहनाला पाहून घाबरलेल्या पोर्शेच्या ड्रायव्हरने टर्न घेतला. गाडी जास्त वेगात होती. यावेळी त्याचे गाडीवरील नियत्रंण सुटले आणि बाईकला धक्का दिला. (हेही वाचा - Pune Vedant Agarval Accident Case: पुणे अपघातात दोघांचा जीव घेणाऱ्या बड्या व्यावसायिकाच्या मुलाला जामीन मंजूर, नेमक्या अटी काय?)
या घटनेनंतर पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कारचालक मुलगा आणि त्याच्या मित्रांना दुपारी दीडच्या सुमारास येरवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवला होता. या घटनेनंतर पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी याविरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या अपघातानंतर स्थानिकांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोर्शे गाडीतून बाहेर काढून चांगलाच चोप दिला. हा धनिकपुत्र अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला. न्यायालयाने या धनिकपुत्राला 15 दिवस वाहतूक पोलिसासोबत चौकात उभे राहून काम करण्याची, वाहतुकीचे बोर्ड रंगवण्याची आणि अपघात या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहण्याचे 'कठोर' निर्देश दिले. या धनिकपुत्राचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यासही सांगण्यात आले आहे.