Ajit Pawar | (File Photo)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी पुण्यातील कोविड-19 (Coronavirus) निर्बंध शिथिल करण्याबाबत मोठ्या घोषणा केल्या. शहरात साप्ताहिक कोविड-19 आढावा घेतल्यानंतर पवार यांनी घोषणा केली की, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील महाविद्यालये आणि विद्यापीठे सोमवारपासून पुन्हा सुरू होऊ शकतात. मात्र त्यांनी असेही सांगितले की, केवळ पूर्ण लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांनाच 'लाइव्ह' वर्गांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल किंवा कॅम्पसमध्ये परवानगी दिली जाईल. तसेच, इतर जिल्ह्यांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य आहे.

पवार यांनी असेही जाहीर केले की, खाजगी कार्यालये सोमवारपासून 100% क्षमतेसह पुन्हा सुरू करू शकतात, परंतु त्यांना कोरोना विषाणू नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यासोबत रेस्टॉरंट्सना आता रात्री 11 पर्यंत खुले राहण्याची परवानगी आहे, सध्या ही मुदत रात्री 10 पर्यंत आहे. यासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद असल्याने लहान व्यावसायिकांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. कोविड स्थिती नियंत्रणात असल्याने पर्यटनस्थळेदेखील सोमवारपासून सुरू करण्यात यावीत असेही त्यांनी सांगितले. पर्यटकांना मास्क घालणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल.

पुणे जिल्ह्यात लसीकरणाला चांगली गती देण्यात आली आहे. लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविड संसर्गाचे प्रमाणदेखील नियंत्रणात असल्याने हे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र येणाऱ्या सण-उत्सवाचा कालावधी लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घेण्यासाठी कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Mission Kavach Kundal Yojana: महाराष्ट्रात 'मिशन कवच कुंडल योजने'ला आजपासून सुरुवात, दिवसाला 15 लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य)

येत्या 22 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही पवार यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण वाढविण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या. दरम्यान, पुणे जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 3.01 एवढा असून मागील आठवड्यात 3 हजार 897 नवे बाधित रुग्ण आढळले तर 4 हजार 382 रुग्ण कोरोना मुक्त झाले. जिल्ह्यात कोरोना मुक्तीचे प्रमाण 98 टक्के असून मृत्यूदर 1.6 टक्के आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.