राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निशेधार्थ आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक देण्यात आली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. शहरात तब्बल 7500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बंद दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या अपमानास्पद घोषणा देण्यावर बंदी असल्याचे समजते.
पुणे बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सकाळी 9.30 वाजलेपासून पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला प्रारंभ होईल. डेक्कन जिमखाना येथून निघालेला हा मुक मोर्चा डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहालपर्यंत जाणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाली असून, मोठ्या प्रमाणावर पोलीसफाटा तैनात आहे. गृहरक्षक दलाचे जवान, शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेची पथकं असा चोख बंदोबस्त आहे.
दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या मोर्चा, सभा आदींमधून दिल्या जाणाऱ्या घोषणा हा अनेकदा पोलिसांसाठी डोकेदुखीचा विषय असतो. या घोषणांमुळे अनेकदा गोंधळाचे वातावरण निर्माण होते किंवा कधीमधी नवे वादही वाढतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आगोदर खबरदारी घेत अपमानास्पद घोषणांवर बंदी घातली आहे. बंद दरम्यान संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पुणे पोलिसांतील सुमारे 100 ज्येष्ठ अधिकारी, 1000 पेक्षाही अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्यामुळे शहाला छावणीचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळत आहे.