
शाळेबाहेर थांबून सतत विद्यार्थींनींचा विनयभंग करणाऱ्या 22 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पुणे (Pune) परिसरातील कात्रज (Katraj) येथे घडली. संबधित मुलगी ट्युशनला जात असताना आरोपीने तिचा विनयभंग केला, अशी तक्रार पीडिताच्या आईने स्थानिक पोलिसात केली. आरोपीने हे कृत्य पहिल्यांदाच केले नसून तो अनेक दिवसांपासून मुलींना निर्जन स्थळी गाठून त्यांच्या विनयभंग करत असे, अशी धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. आरोपीच्या वाईट कृत्याला घाबरुन अनेक मुली घराबाहेर पडणे टाळत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
वैभव कांबळे असे याप्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ट्युशनला जात होती. त्यावेळी वैभवने पीडित मुलीला निर्जनस्थळी गाठून पत्ता विचारला आणि त्या बहाण्याने त्याने तिचा विनयभंग करायला सुरुवात केली. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत पीडितने तेथून पळ काढून आपल्या ट्युशनमधील शिक्षकांना हा सर्व प्रकार सांगितला. शिक्षकांनी वेळ न घालवता काही लोकांच्या मदतीने आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, वैभवने त्या ठिकाणाहून पळ काढला होता. त्यानंतर शिक्षकांनी पीडित मुलीच्या आईला फोन करुन बोलावून घेतले. आपल्या मुलीसोबत हा धक्कादायक प्रकार घडल्याचे आईच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलिसात धाव घेऊन आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. हे देखील वाचा- तरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी
पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, वैभवने केवळ या एकाच मुलीला त्रास दिलेला नाही तर, तो अनेक शाळांच्या आसपासच्या परिसरात हाच उद्योग करत असे. स्थानिकांनीही पोलिसांना या माहितीचा दुजारा दिला. काही मुलींनी तर याच्या भितीने घराबाहेर पडणेच बंद केले होते.