पुणे: 70 वर्षीय COVID-19 रूग्ण आयसोलेशन सेंटरमधून पळाला, 17 किमी चालत गाठलं घर!
Coronavirus| Representational Image| (Photo Credits: PTI)

पुण्याच्या बालेवाडी भागात आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या 70 वर्षीय कोव्हिड 19 रूग्णाने पळ काढत येरवडामधील आपलं गाठलं आहे. दरम्यान प्रशासनाच्या क्वारंटीन सेंटरमधून निघून जाण्याचं त्यांचं कारण तेथे त्यांना जेवायला मिळत नव्हतं, स्वच्छ वॉशरूम नव्हते असं सांगण्यात आलं आहे. मंगळवारी अचानक त्यांच्या शेजार्‍यांना आजोबा बंद घराबाहेर बसलेले दिसले. या आजोबांपाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील क्वारंटीन करण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी काहीजणांना कोरोनाची बाधा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पुणे: आझम कॅम्पस मध्ये मशिदीचं रूपांतर क्वारंटीन सेंटर मध्ये!

ANIच्या वृत्तानुसार,स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ धेंडे यांनी 70 वर्षीय वृद्ध रूग़्ण क्वारंटीन सेंटरमधून गायब झाले आहेत ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र नंतर आम्ही त्यांना त्याची माहिती देऊन रिहॅब सेंटरमध्ये पुन्हा ठेवण्यास सांगितले. सुरूवातीला ते कोरोना संशयित असल्याने त्यांना 24 एप्रिलला खरडी येथील रक्षानगर क्वारंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. नंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बालेवाडीच्या NICMAR मध्ये ठेवण्यात आलं. 25 एप्रिलला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला रूग्ण असा अचानक पुन्हा आलेला पाहून शेजार्‍यांच्याही मनात धडकी भरली. त्यानंतर प्रशासनाला कळवत नगरसेवक धेंडे यांनीच रूग्णवाहिकेची सोय करून त्यांची पुन्हा क्वारंटीन सेंटरमध्ये व्यवस्था केली.

दरम्यान नगरसेवकांनी क्वारंटीन सेंटरमध्ये योग्य सोयी सुविधा आहेत की नाहीत? हे पहावं अशी वरिष्ठ अधिकार्‍यांना विनंती केली आहे. दरम्यान त्या 70 वर्षीय रूग़्णाचा मुलगा देखील कोरोना बाधित आहे. प्रशासनाने त्याची खास अ‍ॅम्ब्युलंसमध्ये सोय करून वडीलांची मनधरणी करण्यासाठी त्याला घरी बोलावलं. दोन तासांच्या मेहनतीनंतर ते राजी झाले आणि त्यांना परत क्वारंटीन सेंटरमध्ये नेण्यात आलं. यात सुदैवाची बाब म्हणजे हॉस्पिटल ते घर या प्रवासात त्या रूग्णाच्या संपर्कामध्ये इतर कोणतीही व्यक्ती आली नाही.