Priyanka Mohite, सातार्‍याची 30 वर्षीय गिर्यारोहक ठरली कांचनगंगा शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय महिला
प्रियांका मोहिते| Twitter

साताराच्या प्रियंका मोहिते (Priyanka Mohite) या गिर्यारोहक तरूणीने जगातील सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाचे कांचनगंगा शिखर (Mount Kanchenjunga) पार करून अजून एक विक्रम रचला आहे. कांचनगंगा पादाक्रांत करणारी प्रियंका ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. वयाच्या 30 व्या वर्षी तिने हा विक्रम केल्याने सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विविध स्तरांमधून प्रियांका मोहिते आणि तिच्या परिवाराला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कांचनगंगा हे हिमालयातील उंच पर्वतशिखर आहे. माऊंट एव्हरेस्ट, के2 नंतर कांचनगंगा हे तिसरं सर्वात उंच शिखर आहे. सिक्कीम मध्ये असलेल्या या पर्वताची उंची 8586 मीटर आहे. प्रियांका मोहितेने गुरुवार (5 मे दिवशी) संध्याकाळी 5 च्या सुमारास कांचनगंगा शिखर सर केले आहे.

आमदार रोहित पवार यांच्याकडून अभिनंदन

प्रियांका मोहिते हिने मागील वर्षीच हिमालयातील अन्नपूर्णा-1 हे सर्वात खडतर शिखर सर केले होते. ही कामगिरी फत्ते करणारी देखील ती पहिली भारतीय महिला होती. माऊंट अन्नपूर्णा हे पर्वत हिमालयाचाच एक भाग असून ते नेपाळमध्ये आहे. समुद्रसपाटीपासून या पर्वताची उंची 8 हजार फुटांपेक्षाही जास्त आहे.

प्रियंकाने यापूर्वी 2016 मध्ये माऊंट किलिमंजारो आणि 2018 मध्ये माउंट ल्होत्से, माउंट मकालू देखील पादाक्रांत केला आहे. तिला Tenzing Norgay Adventure Award 2020 ने देखी गौरवण्यात आले आहे.