Uddhav Thackeray, Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: File Photo)

अखेर शिवसेनेचे स्वप्न सत्यात उतरले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह महाविकास आघाडीच्या सहा नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नुकताच शिवतीर्थावर हा शपथ विधी सोहळा पार पडला, त्यानंतर चहूबाजूंनी उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narednra Modi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

पीएम नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, 'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील'. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी अनेक देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी व मनमोहन सिंह हे प्रत्यक्ष उपस्थिती राहू शकले नसले तरी त्यांनी आपल्या शुभेच्छा उद्धव ठाकरे यांना दिल्या आहेत.

(हेही वाचा: उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ)

दरम्यान, शिवतीर्थावर नुकताच हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेचे दिग्गज नेते जयंत पाटील व छगन भुजबळ आणि कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.  त्यानंतर आता उद्धव ठाकरे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील व त्यानंतर कॅबिनेटची पहिली बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्य शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.