मान्सून लांबल्याने (Monsoon Rain) त्याचा परिणाम हा राज्यातील पाण्याच्या साठ्यावर आणि भाजीपाल्यावर परिणाम हा होताना दिसत आहे. पाण्याचा तुटवडा आणि वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. खरिपातील सरासरी लागवडीच्या वीस टक्केही लागवड झालेली नाही. त्यामुळे जुलै, ऑगस्ट महिन्यांत भाज्यांचा तुटवडा निर्माण होऊन दर कडाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर लवकर पावसाची सुरुवात नाही झाली तर नागरिकांसमोरील समस्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Maharashtra Monsoon Update: विदर्भाच्या काही भागात आज मान्सूनचे आगमन, हवामान विभागाचा अंदाज)
राज्यात वर्षभरात सुमारे 11 लाख 52 हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड होते. त्यांपैकी खरिपात म्हणजे जून महिन्यात 50 टक्के, रब्बी हंगामात 30 टक्के आणि उन्हाळी हंगामात 20 टक्के क्षेत्र असते. पण, यंदा मोसमी पाऊस लांबला आहे. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणीही पाण्याचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करणे टाळले आहे. केवळ नद्यांच्या काठावर काही प्रमाणात भाजीपाल्यांच्या लागवडी होत आहेत. झालेल्या लागवडीही उन्हामुळे अडचणीत आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसर टोमॅटो, भेंडी, बटाटासह अन्य भाजीपाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील नदीकाठांवर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड होते. पंरतू सध्या वाढत्या तापमानामुळे आणि पाण्याची कमतरता यामुळे या परिसरातील भाजी उत्पादनावर देखील मोठा परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे भाजी टंचाईचा सामना देखील करावा लागू शकतो. राज्यातील सध्याचे हवामान भाजीपाला लागवडीस पोषक नाही, त्याचा परिणाम पुढील दोन महिन्यांतील भाजीपाल्यांच्या उपलब्धतेवर होऊ शकतो, असा इशारा तज्ञांनी देखील दिला आहे.