Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या आक्रमक भुमिकेत पाहायला मिळत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले बंड आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेऊन घेतलेली मंत्रीपदाची शपथ यामुळे संतापलेल्या पवार यांनी थेट कारवाई सुरु केली आहे. कारवाईचा पहिला दणका प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांना बसला आहे. पटेल आणि तटकरे या दोघांना पक्षाचे सदस्य पद आणि इतर जबाबदाऱ्यांवरुन थेट बडतर्फ करण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

शरद पवार यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, मी (शरद पवार), , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे पक्षविरोधी कारवाया केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे. (हेही वाचा, Sharad Pawar On Maharashtra Political Crisis: साताऱ्यात शरद पवारांचा शक्तिप्रदर्शन; म्हणाले, 'महाराष्ट्रात जातीचे राजकारण चालणार नाही')

अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आणि त्याला केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांनी दिलेली साथ, यावरुन शरद पवार आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांनी आपल्या नऊ सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह इतरही काही मिळून नऊ जणांचा समावेश आहे.

ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या अभुतपूर्व बंडाला शरद पवार आपल्या खास स्टाईलने अगदी संयमीतपणे पुढे गेले. घडल्या प्रकाराचे आम्हाला अजिबात नवल वाटत नाही. या आधीही आपल्या आयुष्यात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. आणि आपण त्या यशस्वीपणे हाताळल्या आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. जनता हेच आपले कोर्ट आहे. जनतेच्याच कोर्टात या सर्व प्रकरणाचा निकाल लागेल असे, शरद पवार यांनी अत्यंत आत्मविस्वासाने सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडलेल्या बंडामुळे राज्याचे राजकीय वातावरण मात्र जोरदार तापले आहे.