Sanjay Raut, Ashish Shelar Meet: संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात भेट? राज्याच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा
Sanjay Raut and Ashish Shelar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याच्या राजकीय वर्तुळातील राजकीय चर्चा पुन्हा पुन्हा नव्याने आकार घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या चर्चा थांबतायत तोवर पुन्हा एकदा वृत्त आले आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात गुप्त भेट झाल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

कॅमेऱ्यात कौद झालेल्या गाड्यांचा दाखला देत टीव्ही 9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात भेट झाल्याचे समजते. मुंबई येथील नरीमन पॉईंट येथे ही भेट झाल्याचे वृत्त आहे. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. भेटीचे कारण आणि तपशील अद्याप बाहेर येऊ शकला नाही. परंतू, राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत. (हेही वाचा: Mahadev Jankar: मी पंतप्रधान होणारच, राष्ट्रीय समाज पक्षाचे अंतिम ध्येय दिल्ली : महादेव जानकर)

राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये होत असलेल्या गुप्त आणि उघड भेटी नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. गेल्याच काही आठवड्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही काळ चर्चा झाली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले. तेथे त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीपूर्वी संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात एक भेट झाली होती.

दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमधील काही नेत्यांची मंगळवारी एक गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे आदी मंडळीउपस्थित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भेटीगाठींना इतका का बहर आला आहे, याबाबत उत्सुकता आहे.