राष्ट्रीय समाज पक्ष (Rashtriya Samaj Party) संस्थापक आणि अध्यक्ष महादेव जानकर(Mahadev Jankar) यांनी यांनी रासपचे (RSP) अंतिम ध्येय हे दिल्ली (Delhi) असल्याचे म्हटले आहे. एक ना एक दिवस मी पंतप्रधान होईनच. त्यासाठी मी कोणाचीही मदत घेईन, आधार घेईन परंतू पंतप्रधान होईनच, असे उद्गार रासपाध्यक्ष महादेव जानकर यांनी काढले आहेत. ते कोल्हापूर येथे बोलत होते. आपला पक्ष हळूहळू वाढत आहे. आपण कोणाचे गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांचे रस्ते डांबरी आहेत. भाजपचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. परंतू, माझा पाणंद रस्ता आहे. त्यामुळे मी पाणंद रस्त्यानेच प्रवास करीन आणि ध्येय गाठेन असेही जानकर म्हणाले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय समाज पक्ष गंभीर आहे. येत्या चार जुलै रोजी रासपा राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहितीही जानकर यांनी दिली. दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर झालेल्या कथीत हल्ल्याबाबत विचारले असता महादेव जानकर म्हणाले ते माझ्या पक्षात नाहीत. मग त्यांच्यावर बोलून मी त्यांना उगाच का मोठं करु असे म्हणत जानकर यांनी त्या विषयावर भाष्य करणे टाळले. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: 'भाजपने मला फसवलं'; रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचा गंभीर आरोप)
महादेव जानकर हे अत्यंत तळागाळातून वर आलेले नेतृत्व आहे. जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांचा वरदहस्त होता. गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावरुन बोलताना मी माझा राजकीय वारसा महादेव जानकर यांना देईन असे म्हटले होते. दरम्यान, मुंडे यांचे अकाली निधन झाले. परंतू, पुढे 2014 मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मंत्री असताना महादेव जानकर हे कॅबिनेट मंत्री होते. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये जानकर यांनी राजपाच्या तिकीटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती येथील उमेदवार सुप्रिया सुळे यांना दिलेली टक्कर दखलपात्र होती.
महादेव जानकर यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत आणखी बोलायचे तर, त्यांनी नांदेड (1998), सांगली (2006), माढा(2009), बारामती (2014) आदी मतदारसंघातून चार वेळा लोकसभा निवडणूक लढली आहे.परंतू, सर्वच निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक निवडणुकीत महादेव जानकर पराभूत झाले असले तरी, त्यांना मिळालेले मताधिक्य आणि लढत चर्चेत राहिली.