Maharashtra Assembly Elections 2019: 'भाजपने मला फसवलं'; रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचा गंभीर आरोप
Mahadev Jankar Photo Credit: Twitter

महायुती घटक पक्षांचे जागावाटप झाले. प्रामुख्याने महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना-भाजप यांच्यातील जागावाटप झाले. दोन्ही पक्षांनी आपल्याला हव्या तितक्या जागा घेतल्या. काही मित्रपक्षांना सोडल्या. मात्र, याच जागावाटपावरुन मित्रपक्ष नाराज असून, महायुतीत कुरबुरी सुरु झाल्याचे पुढे आले आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आज (7 ऑक्टोबर 2019) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महादेव जानकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. जागावापटपावरुन तीव्र नाराजी व्यक्त करत “भाजपाने मला फसवलं, माझ्या पक्षाला धोका दिला आहे,” अशा थेट शब्दांत आरोप करत जानकर यांनी आपल्या मनातील खदखद आणि तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना महादेव जानकर यांनी सांगितले की, 'दौंड, जिंतूर येथील जागेबाबत पक्षाचे स्थानिक कार्यकर्तेच निर्णय घेतील.' महादेव जानकर यांच्या या विधानाचा अर्थ राजकीय वर्तुळात या मतदारसंघात रासप महायुतीसोबत असहकार पुकारणार असा काढला जात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यात झालेल्या जागावाटपामध्ये भाजप 164 तर, शिवसेना 124 जागा लढणार आहेत. या जागावाटपानुसार महायुतीतील इतर घटकपक्षांसाठी भाजपच्या कोट्यातून जागा सोडण्यात येणार होत्या. मात्र, भाजपने ऐनवेळी मित्रपक्षांना आपल्याच निवडणूक चिन्हावर (कमळ) लढण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे भाजपने एकाच वेळी शिवसेना आणि मित्रपक्षांनाही धक्का दिल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, काहींना 'एअर कंडिशनर', कुणाला 'पाव', अनेकांचा 'गॅस' तर काहींचा 'भाजीपाला'; विधानसभा निवडणुकीत चिन्हांची कमाल)

भाजपने तब्बल 150 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे मित्रपक्षांसाठी केवळ 14 जागा उरतात. त्यामुळे रासपसह इतर मित्रपक्षांमध्ये जोरदार नाराजी आहे. या नाराजीचा पहिला अंक महादेव जानकर यांच्या पत्रकार परिषदेच्या रुपने मुंबईत पार पडला. आता इतर मित्रपक्ष काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.