PM Narendra Modi Pune Visit: सत्तास्थापनेच्या वादंगानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात घेणार पीएम नरेंद्र मोदींची भेट; जाणून घ्या कारण
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे (Photo Credit : Facebook)

भाजपला मोठ्या शिताफीने सत्तेपासून दूर ठेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह यांनी विधानसभेसाठी महाराष्ट्रात चांगलाच प्रचार केला होता, मात्र त्याला शरद पवार यांनी मात दिली. आता राज्याचे नवे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पीएम मोदी यांची 7 डिसेंबर रोजी पुण्यात भेट होणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर 9 दिवसांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. पीएम मोदी 7 डिसेंबर रोजी पुण्यात, दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोलिस महासंचालक (डीजी) आणि महानिरीक्षक (आयजी) च्या वार्षिक परिषदेत भाग घेण्यासाठी येत आहेत.

भारतीय विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER), बाणेर येथे 6 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन दिवसीय कार्यक्रमात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील सहभागी होणार आहेत. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतील. 7 व 8 डिसेंबर या दोन दिवशी पंतप्रधान पुण्यामध्ये असणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह 180 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील.

पंतप्रधानाचे स्वागत हे त्या राज्याचा मुख्यमंत्र्यांकडून केले जाते, तसा राजशिष्टाचार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे विमानतळावर नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला हजर असतील. या परिषदेमध्ये देशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हजेरी लावणार आहेत. यामध्ये आगामी वर्षातील सुरक्षेचा विचार करून पुढील रोडमॅप ठरवला जाईल. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परिषद केंद्रीय गृह मंत्रालय आयोजित करत आहे आणि सर्व काही दिल्लीमधूनच को-ऑर्डीनेट केले जाणार आहे. (हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल; प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी 4 जानेवारीला होणार सुनावणी)

महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटली. भाजपशी संबंध तोडत शिवसेनेने कॉंग्रेस आणि शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव यांच्या भेटीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.