PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, 13 जुलै 2024 रोजी मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. उद्या संध्याकाळी 5:30 च्या सुमाराला, पंतप्रधान मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र येथे पोहोचतील. या कार्यक्रमात ते 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. त्यानंतर, संध्याकाळी 7 च्या सुमाराला पंतप्रधान, जी-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, मुंबई येथे आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन करतील.
आपल्या मुंबई भेटीत पंतप्रधान, 16,600 कोटी रुपये खर्चाच्या ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. ठाणे आणि बोरिवली दरम्यान हा दुहेरी ट्यूब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे, ज्यामुळे बोरिवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाणेकडील ठाणे घोडबंदर रोडदरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण होईल. प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किमी आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास 12 किमीने कमी होईल आणि प्रवासाच्या वेळेत सुमारे 1 तासाची बचत होईल.
पंतप्रधान, 6300 कोटी रुपये खर्चाच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी करणार आहेत. गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्गदरम्यान रस्ता जोडणे ही गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची कल्पना आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे 6.65 किलोमीटर आहे आणि पश्चिम उपनगरांना नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे मुंबई एक्स्प्रेस वेशी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
या भेटीदरम्यान पंतप्रधान कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेच्या कामाची तसेच नवी मुंबईमध्ये तुर्भे येथे गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलच्या कार्याची पायाभरणी देखील करणार आहेत. कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी रेल्वे गाड्या यांच्या वाहतुकीचे पृथक्करण करण्यात मदत होईल. नवी मुंबई येथील गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल 32,600 चौरस मीटर्सहून अधिक क्षेत्रावर उभारले जाणार असून हे टर्मिनल स्थानिक जनतेसाठी अतिरिक्त रोजगार संधी निर्माण करेल आणि सिमेंट तसेच इतर वस्तूंच्या हाताळणीसाठी आवश्यक अतिरिक्त टर्मिनलची गरज पूर्ण करेल. (हेही वाचा: CPI Inflation: महागाईने गाठला चार महिन्यांतील उच्चांक, जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांच्या पुढे)
या मुंबई भेटीदरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवे फलाट (प्लॅटफॉर्म) तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील फलाट क्र.10 आणि 11 चा विस्तारीत भाग यांचे लोकार्पण देखील होणार आहे. मुंबई दौऱ्यात सुमारे 5600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते केला जाणार आहे.