Photo Credit- X

PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते ठाणे येथे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Scheme) आणि महिला सक्षमीकरण अभियानाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. जिल्हा प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी दिवसभरातील कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला, त्यात पावसाची व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि पार्किंग व्यवस्था यांचा समावेश आहे.

लाडकी बहिण योजना ही एकनाथ शिंदे सरकारची प्रमुख योजना आहे, ज्या अंतर्गत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना 1500 रुपये प्रति महिना मदत म्हणून दिली जाते. शिंदे सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केलेल्या महिला सक्षमीकरण अभियानाचा उद्देश महिलांच्या सामाजिक-आर्थिक विकासाशी संबंधित सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांना एका व्यासपीठावर आणण्याचे आहे.

पीएम मोदींच्या ठाण्यातील कार्यक्रमाला सुमारे 40 हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून, ठाणे तसेच आसपासच्या महापालिकांमधून सुमारे एक हजार 200 बसगाड्यांची ये-जा घोडबंदर रोड परिसरात होणार आहे. अधिकाऱ्यांनी काल पावसाची परिस्थिती, वाहतूक व्यवस्थापन आणि पार्किंग व्यवस्था यावर लक्ष केंद्रित करून आगामी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. (हेही वाचा: Maharashtra Cabinet Decisions: राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ, होणार 4,860 विशेष शिक्षक पदांची निर्मिती; मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले महत्वाचे निर्णय, घ्या जाणून)

यासह वृत्तानुसार, पीएम मोदी 5 ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम, महाराष्ट्र येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता हस्तांतरित करतील. पीएम मोदी प्रत्येकी 2,000 रुपये डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 18 वा हप्ता म्हणून पाठवतील. यावेळी पीएम मोदींचा योजनेशी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रमही आहे. वृत्तानुसार, 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्याचा लाभ देणार आहेत. यासाठी केंद्र सरकार 20 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.