Ganpati | Representational image (Photo Credits: pixabay)

गणेशोत्सव (Ganeshotsav) म्हटलं की गणेश मंडळ आणि कार्यकर्त्यांची लगबग सुरु होते. लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघा एकच महिना बाकी आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. लंबोदराच्या स्वागताची पूर्वतयारी म्हणून हे कार्यकर्ते पहिले काम करतात ते म्हणजे वर्गणी (Ganeshotsav Subscription) जमा करण्याचे. त्यासाठी अनेकदा हे लोक नागरिकांकडे, व्यवसायिक, स्थानिक धंदेवाले यांच्याकडे तगादा लावतात, सक्ती करतात. त्यावरुन अनेकदा तक्रारीही दाखल होतात. या तक्रारींची दखल घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Pimpri Chinchwad Police Commissioner Vinay Kumar Choubey) यांनी गणेश मंडळांना स्पष्ट सल्ला दिला आहे. ‘वर्गणी गोळा करताना कोणावरही जबरदस्ती करू नका, जर कोणी तसे करताना आढळले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील', असेही ते म्हणाले.

कोरोना काळात आगोदरच व्यवसायिक, नोकरदार, धंदेवाले यांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे दैनंदिन चरितार्थ चालवायचा कसा हाच प्रश्न डोळ्यासमोर असताना त्यात गणेश मंडळं वर्गणीसाठी सक्ती करतात. कधी कधी प्रचंड तगादा लावतात. हे दरवर्षी होते. त्यातच यंदा काही गणेश मंडळांनी बाजारपेठेतील दुकानदार, व्यवसायिकांवर गणपती वर्गणी वाढवून मागितली. त्यासाठी व्यापाऱ्यांकडे आग्रहही धरला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

व्यापाऱ्यांनी वर्गणीबद्दल बोलताना पुढे सांगितले की, हा विषय केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नव्हे. गणोशोत्सवासोबतच दहीहंडी, नवरात्र, इतर काही स्थानिक उत्सव आणि महापुरुषांच्या जयंतीनिमित्तही वर्गणी मागितली जाते. त्याही वेळी काही लोकांकडून सक्ती केली जाते. इतकेच नव्हे तर मंडळांकडून तगादाही लावला जातो. नागरिकांनी केवळ आपण राहात असलेल्या परिसरासाठीच वर्गणी द्यावी. शिवाय एमआयडीसीमध्ये कंपन्या असतात. त्या ठिकाणी परिसरात नसलेली इतरही अनेक मंडळे येतात. वर्गणी मागतात. वेगवेगळ्या मंडळांना वर्गणी देत बसले तर कारणाशिवाय खर्च वाढतो. त्यामुळे उद्योजक देतील तेवढीच वर्गणी मंडळांनी घ्यावी. उगाचच पाच, दहा हजारांसाठी आग्रह धरु नये, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही म्हटले आहे की, मंडळांनी उद्योजक देतील तेवढीच वर्गणी घ्यावी. उगाचच अधिक वर्गणीची आपेक्षा ठेऊन सक्ती, तगादा लावू नये. तसे करताना कोणी आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.