Bhagat Singh Koshyari

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची वक्तव्ये आणि वाद हे आता समिकरणच झाले आहे. राज्यपालांच्या सातत्यपूर्ण वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील जनमानसात संतप्त भावना आहे. राजकीय पक्षांनी वेळवेळी त्यांच्या विधानांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता तर राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मुंबई हायकोर्टात (High Court) एक फौजदारी जनहित याचिका (Public interest litigation in India) दाखल झाली आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी संवैधानिक पदावर असतानाही राज्यातील सामाजिक शांतता आणि एकोपा बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी फौजदारी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांची पदावरुन उचलबांगडी होणार का, याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Bhagat Singh Koshyari Controversial Statement: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “शिवाजी जुन्या काळातले आदर्श”)

अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत दीपक जगदेव यांनी ही याचिका दाखल केली आहे. लवकरच दाखल याचिकेवर सुनावणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या दरबादात तरी राज्यपालांबाबत काही विचार होतो का याबाबत उत्सुकता आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यामुळे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तिला काही विशेषाधिकार प्राप्त असतात. अशा वेळी न्यायालय त्या अधिकारांना धक्का लावत नाही. त्यात हस्तक्षेपही करत नाही. त्यामुळे या याचिकेत न्यायालय काय निर्णय देते याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी हे येत्या 24 आणि 25 तारखेला दिल्लीला जाणार आहेत. या वेळी ते कोणाकोणाला भेटणार, पंतप्रधान अथवा केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्यासोबत त्यांची भेट होणार का? झालीच तर, कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल या भेटीत चर्चा होणार का? याबाबतही उत्सुकता आहे.