Rashmi Shukla | (File Photo)

राज्याला हादरवून टाकणाऱ्या फोन टॅपींग प्रकरणात आता नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जसजसा तापास पुढे जाईल तसतशा या प्रकरणातील सुरुस कथाच बाहेर येऊ लागल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade), माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) आणि मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचे फोन वेगवेगळ्या नावांनी सलग 60 दिवस म्हणजेच दोन महिने टॅप करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अप्पर गृह सचिव यांच्याकडे या चारही फोनचे क्रमांक टॅपिंगसाठी पाठवताना त्यासोबत 'कस्टमर ऍप्लिकेशन फॉर्म' (सीएएफ) जोडला नसल्याचेही तपासात पुढे येत आहे. त्यामुळे हे फोन नेमके कोणाच्या नावावर आहेत हे समजू शकले नसल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात विविध नेत्यांच्या झालेल्या फोन टॅपींगचा कालावधीही दिला आहे. त्यानुसार, नाना पटोले- 18 सप्टेंबर 2017 ते 14 नोव्हेंबर 2017, बच्चू कडू- 18 सप्टेंबर 2017 ते 14 नोव्हेंबर 2017, संजय काकडे- 13 नोव्हेंबर 2017 ते 9 जानेवारी 2018, आशिष देखमुख- 13 नोव्हेंबर 2017 ते 9 जानेवारी 2018 या काळात या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरात पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीर फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुणे येथील बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (हेही वाचा, Phone Tapping Case: देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोले यांचा गंभीर आरोप; म्हणाले 'आमचे फोन अवैधरित्या टॅप केले')

रश्मी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त होत्या. त्यावेळी त्यांनी विविध राजकीय नेत्यांचे फोन टॅप करुन ते संभाषण भाजपा सरकारमधील काही वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणाची आता चौकशी सुर आहे. तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यतेखाली नेमलेल्या एका समितीने या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखलकरण्याचे आदेश दिले.