Phone Tapping Case: देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोले यांचा गंभीर आरोप; म्हणाले 'आमचे फोन अवैधरित्या टॅप केले'
Nana Patole vs Devendra Fadnavis | (Photo Credit: Archived, edited, representative images)

बेकायदेशीर फोन टॅपींग (Phone Tapping Case) प्रकरणीक आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर पुणे येथे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाल निर्माण झाली आहे. याच प्रकरणावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. बेकायदेशीरपणे फोन टॅपींग झाले असेल तर त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी याबाबत ट्विट केले आहे.

नाना पोटोले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्यासाठी आगोदर गृहसचिवांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जर आमचे फोन अवैधरित्या टॅप केले गेले असतील तर त्यात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता. त्यामुळे गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी व्हायला हवी. नाना पटोले यांनी आपल्या ट्विटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने फोन टॅपींगबाबत दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचाही उल्लेख केला आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी या प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुप्तवार्था विभागाच्या पोलीस आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्जच्या नावाखाली नाना पटोले, बच्चु कडू यांच्यासह अनेकांचे फोन टॅप करण्याबाबत परवानगी घेतली. तर अनेकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले, असेही वळसे पाटील यांनी म्हटले. (हेही वाचा, Rashmi Shukla: ड्रग्जच्या नावाखाली नाना पटोले, बच्चू कडू यांच्यासह अनेकांचे फोन टॅप; गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती)

रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या फोन टॅप केल्याची माहिती देताना दिलीप वळसे पाटील यांनी 4 नावांचाही उल्लेख केला आहे. यात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणात राज्य सरकारने पोलीस महासंचालकांना आणि आयुक्तांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रश्मी शुक्ला दोषी आढळल्या आहेत. परिणामी त्यांच्यावर पुणे येथील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.