Rashmi Shukla | (File Photo)

महाराष्ट्रातील फोन टॅपींग (Phone Tapping Case in Maharashtra) प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर महाविकासआघीड सरकारमधील मंत्र्यांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. मंत्री नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांनी आगोदर त्यांच्यावर भाजपच्या एजंट असा आरोप केला होता. या वादात आता शिवसेनेचे माजी खासदार हरीभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनीही उडी घेतली आहे. रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना बिल्डरांकडून खंडणी वसूल करायच्या असा खळबळजनक आरोप राठोड यांनी केला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यामार्फत त्या खंडणी गोळा करायच्या असे राठोड यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे फोन टॅपींग प्रकरणात झालेल्या आरोप प्रत्यारोपात हरीभाऊ राठोड यांचे कुठेच नाव आले नव्हते. मात्र, राठोड यांनीच स्वत: या वादात प्रतिक्रिया दिल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. आपल्या आरोपांबाबत विस्ताराने माहिती देताना राठोड यांनी म्हटले आहे की, धुमाळ हे 2016 मध्ये एटीएसमध्ये कार्यरत होते. या वेळी ते प्रॉपर्टी सेलमध्ये कार्यरत असल्यासारखे दाखवायचे आणि रश्मी शुक्ला यांच्यासाटी खंडणी वसूल करायचे. (हेही वाचा, Jitendra Awhad On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा आरोप हस्यास्पद- जितेंद्र आव्हाड)

खंडणी वसुलीचे प्रकरण अतिशय गंभीर होते. मात्र, तरीही पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे हे प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. परंतू, त्यांनी यावर कारवाई करण्याऐवजी हे प्रकरण रफादफा केल्याचा आरोप हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.

पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ याला निलंबीत केल्याची माहिती रश्मी शुक्ला यांनी दिली होती. परंतू, प्रत्यक्षात धुमाळ याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. पुढे त्यांनी निवृत्तीपूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. हे प्रकरण तेव्हा प्रसारमाध्यमांपूढे आले होते. या वेळी या प्रकरणातील व्हिडिओचे फु़टेज फॉरेन्सीक लॅबला पाठवून तपासण्यात येईल असेही म्हटले होते. परंतू, यात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, असे हरीभाऊ राठोड यांनी म्हटले आहे.