पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे जनतमध्ये प्रचंड नाराजी होती. ही नाराजी कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून अल्पसा प्रयत्न झाला. या प्रयत्नांचा भाग म्हणून इंधनांच्या दरात काही पैशांची कपात झाली. पेट्रोल, डिझेलच्या किमतींमधील कपातीची ही कासवगती अद्यापही कायम असून, जनतेला ती कितीपत दिलासा देईल याबाबत साशंकता आहे. दरम्यान, राजधानी मुंबईत आज पेट्रोल, डिझेलचे दर अनुक्रमे १८ आणि १४ पैशांनी कमी झाले. त्यामुळे मुंबईत पेट्रोल, डिझेल अनुक्रमे ८४.६८ रुपये आणि ७७.१८ रुपये प्रतिलीटर दराने मिळत आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीतही पेट्रोल, डिझेलच्या दरात काही प्रमाणात कपात झाली आहे. दिल्लीत पेट्रोल १९ पैशांनी तर, डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले आहे. म्हणजेच दिल्लीतील आजचा पेट्रोल दर ७९.१८ पैसै प्रतिलीटर तर, डिझेल ७३.६४ पैसे प्रतिलीटर असा आहे.(हेही वाचा, कार खरेदी करताय? मग डील करताना या गोष्टींची माहिती हवीच..)
गेल्या काही दिवसांत पेट्रोल दर नव्वदीपार गेले होते. अल्पावधीतच हे दर शंभरीपार जाणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने काहीसा दिलासा देत इंधनांच्या चढ्या दराला लगाम लावण्याचा अल्पसा प्रयत्न केला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाचे दर कमी झाल्यामुळे आता दिवाळीच्या तोंडावर तरी पेट्रोल, डिझेल दरात उल्लेखनीय घट होणार का? याबाबत जनतेत उत्सुकता आहे.