महाविकासआघाडीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
सुप्रीम कोर्ट (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. पण याच परिस्थितीत राज्यातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेतेमंडळींच्या बैठका पार पडत आहेत. तसेच पुढील मुख्यमंत्री पदाची कमान कोणाच्या हाती जाणार याकडे सुद्धा जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. याच स्थितीत मुंबईत राहणाऱ्या एसआय सिंग यांनी महाविकासआघाडीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, राज्यपालांनी असे निर्देशन देत जनादेशाच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार बनवण्यासाठी निमंत्रण देऊ नये.

दुसऱ्या बाजूला सत्तासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची एक महत्वपू्र्ण बैठक नेहरु सेंटरमध्ये पार पडणार आहे. या बैठकीला शरद पवार,  प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चौहान, अहमद पटेल उपस्थिती लावणार आहेत. शिवसेनेकडून सुद्धा संजय राऊत, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहेत.('मुख्यमंत्रीपदच काय इंद्रपद दिले तरीही माघार नाही'- संजय राऊत)

दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचाच उमेदवार विराजमान होणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांची याला सहमती आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विराजमान व्हावे असे, महाराष्ट्रातील जनेतेची हाक आहे. महत्वाचे म्हणजे येत्या दोन दिवसात यावर निर्णय घेऊ असेही संजय राऊत म्हणाले आहेत.