Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; एका उच्चशिक्षित महिलेने केले गंभीर आरोप
Sanjay Raut | Photo Credits: Twitter

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. यातच शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात एका उच्चशिक्षित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या याचिकेत संबंधित महिलने म्हटले आहे की, संजय राऊत गेल्या सात वर्षांपासून त्यांचा छळ करत आहेत. त्यांनी आपल्या मागे पाळत ठेवण्यासाठी माणसे लावली होती, हेरगिरी करणे, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे, असे अनेक गंभीर आरोप या महिलेने याचिकेतून केले आहेत.

ज्येष्ठ वकील आभा सिंग यांच्यातर्फे या महिलेने मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश संभाजी शिंदे व न्यायाधीश मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली आहे. दरम्यान, संजय राऊत 2013 पासून आपला छळ करत असून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप संबंधित महिलेने केला आहे. संजय राऊत यांच्या राजकीय वजनामुळेच दबावाखाली येऊन मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुणे लष्कर कोर्टात पहिला खटला दाखल; 5 मार्चला होणार सुनावणी

याप्रकरणातील पहिली सुनावणी 4 मार्चला होणार असून यासंदर्भात संजय राऊत यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच या महिलेने केलेल्या आरोपांवर संजय राऊत काय म्हणतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्वाचे म्हणजे, पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यातच संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनंतर शिवसेना पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे.