'लोकांना आपल्या धार्मिक भावना सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्याची गरज नाही'; हनुमान चालिसाच्या पठणावरून Sharad Pawar यांची टीका 
Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

हनुमान चालिसाच्या पठणावरून महाराष्ट्रातील राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सोमवारी म्हणाले की, लोकांना सार्वजनिक ठिकाणी आपल्या धार्मिक भावना प्रदर्शित करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष भाजपवर टीका करताना पवार म्हणाले की, सत्ता गमावल्यानंतर काही लोक चिंताग्रस्त झाले आहेत. एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला ही चांगली गोष्ट आहे. या बैठकीमधून काही चांगले घडले तर आपल्याला आनंद होईल.

ते पुढे असेही म्हणाले की, पूर्वी राजकीय विरोधकांमध्ये मैत्रीची भावना असायची, परंतु आता शत्रुत्व पहायला मिळते. हनुमान चालिसाच्या पठणावरून सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या वातावरणाबाबत विचारले असता पवार म्हणाले की, ‘प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या धर्माविषयी भावना असतात, परंतु त्या व्यक्तीने आपल्या हृदयात आणि आपल्या मनात ठेवाव्यात. या भावना सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्याची गरज नाही. कोणाला कोणताही धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तो स्वतःच्या घरी करू शकतो,’

ते पुढे म्हणाले, ‘समुदाय किंवा वर्गांविरुद्ध द्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे विपरीत परिणाम समाजात दिसून येतील. महाराष्ट्राने अशी परिस्थिती कधी अनुभवली नाही. अलीकडे अशा घटना घडत आहेत. याचे मला आश्चर्य वाटते.’ मुंबईत घडलेल्या काही घटनांबाबत भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांना भेटायला जाणार असल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, काही ‘चिंताग्रस्त’ लोक जाऊन त्यांचे पर्याय शोधतील हे उघड आहे, परंतु त्यावर विचार करण्याची गरज नाही.

पवार पुढे म्हणाले की. ‘राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी नेहमीच दिली जाते, पण त्याचा कोणताही परिणाम होत नाही. आपण राज्यात अनेक वर्षे काम केले असून आपले आणि शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यात मतभेद असून दोघेही एकमेकांवर टीका करत होतो, मात्र तरीही आपण एकमेकांच्या घरी भेटत असो.’ (हेही वाचा: मंत्री Vijay Wadettiwar यांची नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात गलिच्छ भाषा; चित्रा वाघ म्हणतात, 'महिला खेटरं पूजन करणार...')

ते म्हणाले, ‘धोरणात्मक आघाडीवर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक हल्ला करणे योग्य नाही. मुख्यमंत्री ही एक संस्था आहे, जेव्हा मी मुख्यमंत्रिपदाकडे पाहतो तेव्हा मला फक्त उद्धव ठाकरे दिसत नाहीत, ती एक संस्था आहे आणि तिचा आदर केला पाहिजे. पण, काही लोकांनी त्याचा आदर न करण्याची भूमिका घेतली आहे.’