Pavana River | (Photo Credits: YouTube)

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरातून वाहणारी पवना नदी अचानक चर्चेत आली आहे. या नदीमध्ये जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी (BOD) पातळीत वाढ झाल्याचे एका अभ्यासात पुढे आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) म्हटले आहे की, ही नदी देशातील सर्वात प्रदूषित नदीच्या प्रवाहांपैकी एक बनली आहे. सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे (Sewage Treatment Plants) आणि योग्य प्रमाणात ड्रेनेज (सांडपाणी वाहतूक नलिका) नसल्याने हे प्रदूषित पाणी थेट नदी पात्रात आणि प्रवाहात समाविष्ठ होत आहे. परिणामी या नदीमध्ये विषारी वायू आणि रसायने मोठ्या प्रमाणावर मसळली जात आहेत. त्यामुळे नदीच्या प्रतूषित पाण्यात मोठी वाढ झाली आहे. धक्कादायक म्हणजे नदीतील पाणी प्रदूषणाचा मुख्य स्त्रोत घरगुती सांडपाणी (Domestic Sewage) असल्याचे पुढे आले आहे.

बीओडी पातळीत ऐतिहासिक वाढ

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) नदी प्रदुषणावरुन धोक्याची घंटा वाजवली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पाठीमागील दोन महिन्यांत बायोकेमिकल ऑक्सिजन मागणी (BOD) पातळीत ऐतिहासिक वाढ झालीआहे. ज्यामुळे नदीचा समावेश देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या यादीत वरच्या श्रेणीत झाला आहे. पश्चिम घाटात उगम पावणारी, पवना नदी सुमारे 24 किमी इतक्या लांब अंतरावर पसरली आहे. ही नदी प्रदूषणाच्या धोकादायक स्थितीला पोहोचल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नदी निरीक्षणाच्या ‘प्राधान्य I’ श्रेणीत वर्गीकृत केली गेली आहे.

घरगुती सांडपाणी नदीच्या मुळावर

MPCB उपप्रादेशिक अधिकारी मंचक जाधव यांनी सांगितले की, आकडेवारी आणि तपशीलात पाहायचे तर रावेत आणि दापोडी दरम्यानच्या दोन ठिकाणी सेंद्रिय पदार्थांच्या सूक्ष्मजीव ऑक्सिडेशनसाठी ऑक्सिजनची आवश्यकता दर्शविणारी बीओडी पातळी 30 mg/L च्या पुढे गेली आहे. आगोदरची सर्व आकडेवारी आणि मानकांचे उल्लंघन करते. MPCB अधिकारी सांगतात की, प्रदूषणाचा प्राथमिक आणि सर्वात मोठा स्रोत हा घरगुती सांडपाणी आहे. परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STPs) आणि पुरेशा प्रमाणावर ड्रेनेज सिस्टीम नसल्यामुळे घरगुती सांडपाणी नदीत मोठ्या प्रमाणावर सोडले जात आहे.

जलचरांना धोका

पवना नदीचे एकूण जलआरोग्यच बिघडले आहे. परिणामी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या आरोग्यास तसेच, नदीतील जलचरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या धोक्याचा प्राथमिक इशारा म्हणजे नदीतील मासे मृत्यूमुखी पडू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. घरगुती सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न केल्याने अलिकडेच थेरगावच्या केजू धरणाजवळच्या प्रवाहात हजारो मृत मासे समोर आले आहेत.

मोठ्या प्रमाणावर होत असलेला पर्यावरण बदल, त्यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ गारपीठ यांमध्ये बर पडत असतानाच वाढते प्रदुषण अधिक चिंता वाढवताना दिते. परिणामी पवना नदीसारखी उदाहरणे अधिक वाढण्यापूर्वीच त्यावर कार्यवाही होणे आवश्यक मानले जात आहे. ज्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि जलचरांचे जीवनही सुखकर होईल.