
परभणी (Parbhani जिल्ह्यातील उखळद गावात जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. जमावाकडून दोन मुलांना मारहाण झाली. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंबीर जखमी झाला आहे. जमावाला या मुलांवर शेळ्या चोरल्याचा संशय होता. या संशयातून मुलाला जाब विचारण्याच्या उद्देशाने मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. ज्यात वेदना असहय्य होऊन आणि प्रचंड जखमी झाल्याने एकाचा मृत्यू झाला.
जमावाने मारहाण केलेल्या दोन्ही जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका मुलाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. परभणीचे पोलीस अधीक्षक (एसपी) रागसुधा आर यांनी सांगितले की, पोलिसांनी कथित मॉब लिंचिंगच्या घटनेत नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मारहाण झालेली मुले ही परप्रांतीय आहेत. जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव कृपाणसिंह असे आहे. धक्कादायक म्हणजे ज्या लोकांवर मारहाणीचा आरोप आहे त्यात उखळद गावच्या माजी सरपंचाचाही समावेश आहे. त्यामुळे आरोपी म्हणून माजी सरपंचाचेही नाव पुढे आले आहे. परभणीतील घटनेमुळे परिसरात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. (हेही वाचा, Palghar Police: पालघरमधील वाडा येथे 55 वर्षीय महिलेची डोक्यात दगड घालून हत्या, आरोपी फरार)
परराज्यातील काही तरुण, मुले परिसरात आली आहेत. हे लोक चोरी करतात, अशी चर्चा स्थानिक पातळीवर होती. त्यातूनच नागरिकांमध्ये गैरसमज वाढत गेले आणि त्यांनी या दोन मुलांना पकडले. त्यांच्यावर शेळ्या चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना मारहाण करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती आहे.