Param Bir Singh New Mumbai Police Commissioner (pC - ANI)

मुंबई नवे पोलिस आयुक्त (Mumbai Police Commissioner) म्हणून परमबिर सिंग (Param Bir Singh) यांची वर्णी लागली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे (Sanjay Barve) आज सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांना आज मुंबई पोलिस दलाकडून औपचारिक निरोप दिला जाणार आहे. संजय बर्वे यांच्यानंतर या पदावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक परमबिर सिंग यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, आज गृहमंत्रालयाकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. परमबीर सिंग हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सिंग हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या महासंचालकपदी रूजू होते. मात्र, आता मुंबई पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्याजागी लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपीन के. सिंग हे अतिरिक्त पदभार स्वीकारणार आहेत.

काही दिवसांपूर्वी परमबिर सिंग यांच्या तपास पथकाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीनचीट दिली होती. परमबिर सिंग यांच्यासोबतच अतिरिक्त पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या नावाचीही चर्चा होती.  शुक्रवारी रात्री मुंबईच्या पोलिस आयुक्तांचे नाव निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले होते. मुंबई पोलिस आयुक्त हे राज्यातील अति महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाची जबाबदारी योग्य अधिकाऱ्याकडे असणे गरजेचे आहे. मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त के व्यंकटेशम, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, विधी आणि तांत्रिक विभागाचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, आदी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. (हेही वाचा - महाराष्ट्रात जातीच्या आधारावर होणार जनगणना? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट)

मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. संजय बर्वे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. संजय बर्वे यांनी 28 फेब्रुवारी 2019 ला मुंबई पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. दरम्यान, आज ते निवृत्त होणार आहेत. यापूर्वी बर्वे यांनी भ्रष्टाचार विरोधी विभागाचे महासंचालक म्हणून काम पाहिले आहे.