कार्तिकी यात्रेसाठी (Kartiki Yatra) 6 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूरचे (Pandharpur) विठ्ठल मंदिर (Vitthal Temple) भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच कोरोनाचे नियम पाळून कार्तिकी यात्रा घ्यावी, असा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. दरम्यान, यंदाची कार्तिकी यात्रा होण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यात्रेदरम्यान मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे गरजेचे असणार आहे. मात्र लसीकरणाची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही. मागील 2 वर्षांपासून यात्रा न झाल्याने यंदा कार्तिकी यात्रेला 8 ते 10 लाख वारकरी येणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने मंदिर प्रशासनाने तयारी सुरु केले आहेत.
यंदा 15 नोव्हेंबर रोजी कार्तिक यात्रा नियमांचे पालन करुन साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली होती. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी दिल्याचे संकेत मिळाले आहेत. (Kartiki Ekadashi 2021: यावर्षी कार्तिकी एकादशी वारी होण्याची शक्यता, प्रशासन उपाययोजनांच्या कामात व्यस्त)
आषाढी आणि कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्त राज्यभरातून हजारो भाविक पंढरपूरला येतात. मात्र मागील 2 वर्षांपासून कोरोना संकटामुळे यात्रा, वारी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायात निराशेचे वातावरण होते. परंतु, आता कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होत असल्याने राज्य सरकारने निर्बंध हटवले आहेत. तसंच राज्यभरातील बंद असलेली मंदिरं देखील नवरात्रीच्या मुहुर्तावर खुली करण्यात आली आहेत.