भाऊबीजेच्या सणाने दिवाळीची सांगता झाल्यानंतर आता वारकर्यांना कार्तिकी एकादशीचे (Kartiki Ekadashi) वेध लागले आहेत. यंदा 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी आजपासून पंढरपूर मंदिरामध्ये विठ्ठल- रूक्मिणीचं (Pandharpur Vitthal Rukmini Darshan) दर्शन 24 तास खुलं करण्यात आलं आहे. विठ्ठल आणि रूक्मिणीच्या दर्शनाला राज्यभरातून लोकं तासनतास रांगेत उभी असतात. आता 24 तास दर्शन व्यवस्था सुरू झाल्यानंतर रांगेत उभं राहण्याचा वेळ थोडा कमी होण्याची शक्यता आहे. आजपासून देवाचे राजोपचार बंद करण्यात आले आहेत.
आज संध्याकळी 6.30 च्या सुमारास देवाचे पोशाख आणि शेजारती नंतर विठ्ठक-रूक्मिणीचा पलंग काढला जाईल. जेव्हा देवाचा पलंग काढला जातो तेव्हा त्याची रात्रीची विश्रांती बंद होते. पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये कार्तिकी आणि आषाढी एकादशीला अशाप्रकारे जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून 24 तास मंदिर खुलं ठेवण्याची पद्धत आहे.
कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबरला आहे. त्यानिमित्त अनेक भाविक वारी करत पंढरपूरात दाखल होतात. ही कार्तिकी यात्रा संपल्यानंतर 1 डिसेंबर रोजी विठूरायाची प्रत्यक्ष पूजा होणार असून पुन्हा देवाचे नित्योपचार सुरू केले जाणार आहेत. Pandharpur Kartiki Ekadashi Yatra 2023: यंदा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या दरम्यान पंढरपूर येथे होणार कार्तिकी यात्रा; भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुचना .
महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठूरायाची शासकीय पूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री विभागून हे पद सांभाळत आहेत. पण या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविना यंदा कार्तिकी एकादशीची पूजा संपन्न होणार आहे.
कार्तिकी एकादशी दिवशी अनेकजण दिवसभराचा उपवास ठेवतात. या दिवशी केवळ फलाहार घेऊन दुसर्या दिवशी उपवास सोडला जातो. काही मंडळी वारी करत, पालख्या घेऊन पंढरपूरात दाखल होतात. ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं. ते जवळच्या विठ्ठल मंदिरात भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतात. एकादशीच्या नंतर तुळशीच्या लग्नाला देखील सुरूवात होते. कार्तिकी पौर्णिमेपर्यंत पुढे हा तुळशीच्या लग्नाचा धुमधडाका सुरू असतो.