Pandharpur Wari | Representational Image (Photo Credits: File Image)

Pandharpur Kartiki Ekadashi Yatra 2023 Dates: पंढरपूर (जि.सोलापूर) येथे कार्तिकी यात्रा (Kartiki Ekadashi Yatra Pandharpur) 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती व सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील म्हणाले की, पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना जिल्हा प्रशासन व मंदिर समिती यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व्यतिरिक्त अन्य सोयी सुविधा तसेच विशेष बाब म्हणून खर्च करावयाच्या कामासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. येथे येणारा एकही भाविक पायाभूत सोयीसुविधा पासून वंचित राहणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी.

शहरात कोठेही अस्वच्छता राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. यात्रेनिमित्त निर्माण करण्यात आलेल्या 5 नियंत्रण कक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष तयार करावे. दर्शन रांग लांब जात असल्याने दर्शन रांगेत ठिकठिकाणी भाविकांना विसावा घेण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण कराव्यात. तसेच स्कायवाकच्या ठिकाणीही भाविकांसाठी बैठक व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.

23 नोव्हेंबर 2023 रोजी शुद्ध कार्तिकी एकादशी असल्याने या दिवशी शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. सर्व संबंधित विभागानी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी परस्परात समन्वय ठेऊन चोखपणे पार पाडावी, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी करून दि. 16 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी पंढरपूर येथे येऊन करणार असल्याचेही सांगितले.

यात्रा कालावधीत पंढरपूर येथे जनावरांचा मेळावा भरत असतो, परंतु मागील एक दोन वर्षात लंपी आजारामुळे जनावरांचे मेळावे किंवा बाजार भरले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर जनावरांचा मेळावा घेण्याचे नियोजन असेल तर लंपीग्रस्त जनावरे या मेळाव्यास येणार नाहीत याबाबत पशुसंवर्धन विभागाने दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. तसेच जिल्हाधिकारी यांनी पुढील एक-दोन दिवसात जिल्हास्तरावर या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाची बैठक घेऊन पंढरपूर येथे मेळावा घेऊ शकतो का याची खात्री करावी असेही त्यांनी सूचित केले. (हेही वाचा: CM Eknath Shinde यांनी मराठा बटालियन सोबत जम्मू कश्मीर च्या कुपवाडा मध्ये साजरी केली दिवाळी!)

प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी कार्तिकी यात्रा 2023 साठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. पोलीस अधीक्षक श्री. सरदेशपांडे यांनी पोलीस विभागाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी श्री. गुरव व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री शेळके तसेच मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनीही बैठकीत केलेल्या कामकाजाची माहिती दिली.