Pandharpur By-election 2021: गायक आनंद शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांना गाण्यातून टोला म्हणाले 'पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय' (Video)
Anand Shinde | (File Photo)

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतून एक आमदार मला द्या मी यांचा बरोबर कार्यक्रम करतो, असे सांगणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी जोरदार टोला गलावला आहे. 'हे पवार साहेबांचं सरकार हाय.. तुमच्या बापालापण पडणार नाय..!' असे म्हणत शिंदे यांनी गाण्याच्या माध्यमातून फडणवीस यांना टोला लगावला आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरत भालके (Bhagirath Bhalke) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शिंदे बोलत आणि गात होते. आपण आमचे दिवंगत मित्र भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या प्रेमाखातर भगीरथ भालके यांच्या प्रचारसभेस आल्याचेही शिंदे यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

आनंद शिंदे गाण्यातून काय म्हणाले?

तुम्ही चिडवताय,

आम्ही चिडणार नाय.

तुम्ही लय काय करताय,

तसं काय घडणार नाय.

तुम्ही रडवताय

पण आम्ही रडणार नाय.

हे पवार साहेबांचं सरकार हाय,

तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक ही एकच निवडणूक असली तरी तिचा परिणाम मोठा आहे. राज्य सरकारचे 100 अपराध भरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक राज्यातील जनतेच्या भावना व्यक्त करणारी दिशादर्शक असेल. तुम्ही मला या मतदारसंघातून एक आमदार द्या. मी यांचा बरोबर कार्यक्रम करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. ते भाजप उमेदवार समाधान आवताडे (BJP Samadhan Autade) यांच्या प्रचारसभेत बोलत होते. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पावसातील त्या सभेवरुनही टोला लगावला. सभा जिंकण्यासाठी पावसात सभा घेण्याची गरज नसते. आपल्याला तशी आवश्यकता भासत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शरद पवार यांनी सातारा येथे घेतलेल्या ऐतिहासिक सभेवरुन त्यांनी टोला लगावला. (हेही वाचा, Kalyanrao Kale joins NCP: कल्याणराव काळे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश)

दरम्यान, आनंद शिंदे यांनी धुरळा चित्रपटातील गाणेही या वेळी गायले. ‘नजर धारदार माणूस दमदार’ हे गाणे आनंद शिंदे यांनी गाताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात दाद दिली. या वेळी शिंदे यांनी भगीरथ भालके यांना विजयी करण्याचे अवाहन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उपस्थित होते.