Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश येत्या 31 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे हे कोरोनाच्या विखळ्यात अडकल्याने तेथे दररोज नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली असून नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे. याच दरम्यान पालघर मधील 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 434 वर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे.

पालघर मध्ये आढळून आलेल्या 10 नव्या रुग्णांमध्ये डहाणू मधील 3 जण, पालघर मधील 3 रुग्ण आणि वसईतील 4 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स,नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत. तसेच पोलीस सुद्धा अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले असले तरीही त्याची साखळी तुटली नसल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.(लॉकडाउनमुळे मुंबईतील मद्यपींची गैरसोय होत असल्याने वसई-विरार-पालघर ठरतायत सध्या दारु मिळण्याचे हॉटस्पॉट)

दरम्यान, राज्यात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना आपल्या घरी सुखरुप जाता यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र मुंबई येथून विविध गावात जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 39297 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 27589 जणांवर उपचार सुरु असून 1390 जणांचा बळी गेला आहे.